पोखरा प्रकल्पाची अंमलबजावणी समाधानकारक नसल्यास करवाई – कृषी मंत्री दादाजी भुसे

Advertisements
Advertisements

लाभार्थ्यांशी फोनद्वारे साधला थेट संवाद

कृषी विषयक बाबींचा घेतला आढाव

वर्धा दि 28:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- पोखरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा जिल्हा अतिशय मागे आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास काम न करणाऱ्या अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला.

        जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत श्री भुसे बोलत होते. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

        तळागाळातील शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करणारी ही अतिशय चांगली योजना आहे. परंतु तीन वर्षात या योजनेत वर्धा जिल्ह्यात फारसे समाधानकारक काम न झाल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “आपण स्वतः शेतकऱ्यांची मुले आहात शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. आपण केलेल्या कामावर आपण स्वतः समाधानी आहात का ?याचा जरा विचार करा”.

          शेतकऱ्यांकडे जाऊन संवाद साधणे, मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवणे हे कृषी विभागाचे खरे काम आहे. मात्र सध्या कृषी विभाग केवळ टारगेट ओरिएंटेड काम करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पुढील चार वर्षात पोखरा प्रकल्प संपणार आहे. वर्धा जिल्ह्यात या योजनेचे मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.  या प्रकल्पाला  स्मार्ट योजनेची जोड दिल्यास मोठ्या प्रमाणावर शेती प्रक्रिया उद्योग उभे राहतील आणि त्यासाठी अधिकाऱयांनी नियोजनपूर्ण काम  करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

         या प्रकल्पासंदर्भात गावातील शेतकऱयांची नोंदणी प्रक्रिया वाढवावी, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यात प्रामुख्याने सामावून घ्यावे, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याही नोंदणीवर भर द्याव आणि प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे  निर्देश त्यांनी यावेळी दिलेत.

        सोयाबीन पिकावर आलेल्या रोगाचे संदर्भातही त्यांनी कृषी विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  शेतीशाळा,  क्रॉपसॅप,  निरीक्षण दौरे,  अधिका-यांनी केले असते तर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन वेळीच मिळाले असते आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळता आले असते असेही श्री भुसे यावेळी म्हणाले.

         जे विकलं जातं ते पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची उत्पादकता कशी वाढेल?, त्यांना दोन पैसे कसे मिळतील?, त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत कसा पोहचेल? यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्याबाबत त्यांनी सांगितले.  तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मृद आरोग्य पत्रिकांचे वाटप झाले आहे. कृषी अधिकाऱयांनी  यासंदर्भात शेतकऱ्यांना खताचा वापर कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केल्यास  रासायनिक खताचा अति वापरामुळे  होणारे शेतीचे नुकसान टाळता येईल. कृषी विभागाने पुढील काळात हे कामही प्रामुख्याने हाती घ्यावे असेही श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

      शेतीत कुशल कामगारांची गरज लक्षात घेता मजुरांना व कामगारांना शेतीविषयक प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर  कृषी समिती स्थापन करण्यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच  येणार आहे. गावातील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ही समिती काम करेल असे दादाजी भुसे यांनी सांगितले.

       यावेळी त्यांनी पीक कर्ज वाटपाबाबत समाधान व्यक्त केले. आजपर्यंत 48 हजार 188 शेतकऱ्यांना 486 कोटी 47 लक्ष रुपये कर्जवाटप झाले आहे. मागील वर्षी 37 टक्के कर्ज वाटप झाले होते त्या तुलनेत यावर्षी 52 टक्के कर्ज वाटप झाले असले तरी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज वितरण करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

       यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी संदर्भात सादरीकरण केले. बैठकीला तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

 

मी कृषी मंत्री बोलतोय.….

बैठकी दरम्यान पोखरा प्रकल्पाचा आढावा घेताना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी प्रकल्पातील लाभार्थ्यांशी आणि ज्यांनी अद्याप खरेदी केली नाही अशा चार शेतकऱ्यांशी संवाद साधला. हॅलो, मी कृषी मंत्री दादाजी भुसे बोलतोय. पोखरा योजनेत तुम्ही अर्ज केला होता त्यातून  स्प्रिंकलर खरेदी केले का? त्याचे अनुदान मिळाले का? इत्यादी माहिती घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच रवींद्र येवले या देवळी तालुक्यातील भागापूर येथील शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी समजून घेत बैठक संपल्यावर त्या शेतकऱ्याच्या घरी भेट देण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.

Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *