Breaking News

*कोरोना काळात दुसऱ्यांदा अवयवदानातून किडनी प्रत्यारोपण*

Advertisements
Advertisements

सावंगी रूग्णालयात शस्त्रक्रिया – एकाच्या अवयवदानाने चौघांना नवजीवन

वर्धा – कोरोना काळातही सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात मरणोत्तर अवयवदानातून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे कार्य सुरूच असून या वर्षातील दुसरी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवारी (दि. ९ रोजी) करण्यात आली. नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे भरती झालेल्या ५० वर्षीय रुग्णाने केलेल्या अवयवदानातून सावंगी रूग्णालयात भरती असलेल्या एका ४३ वर्षाच्या रुग्णावर मूत्रपिंड म्हणजेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवाय, या एका व्यक्तीच्या मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना नवजीवन प्राप्त झाले आहे.

बुटीबोरी नजीकच्या टाकळघाट येथील निवासी असलेले छायाचित्रकार दिनेश सखाराम सोनवणे यांना ब्रेन स्ट्रोकमुळे मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांचा मेंदू पूर्णतः मृत झाल्याचे उपचार करणाऱ्या तज्ज्ञांच्या व शल्यचिकित्सकांच्या तपासणीत स्पष्ट झाल्यामुळे तशी कल्पना परिवारातील सदस्यांना देण्यात आली. कोणतेही वैद्यकीय उपचार यापुढे उपयुक्त ठरणार नाही याची जाणीव झाल्याने दिनेश यांची पत्नी सारिका, मुलगा सुयश, मुलगी मानसी आणि पुतण्या सुयोग यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आप्तजनांच्या अनुमतीनंतर अवयव शरीरातून विलग करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. क्षेत्रीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या परवानगीने सदर अवयव विविध रुग्णालयांकडे प्रत्यारोपणाकरिता सुपूर्द करण्यात आले. त्यातून मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमधील ४४ वर्षीय रुग्णावर हृदय प्रत्यारोपण तर मेडिट्रिना हॉस्पिटलमधील ६७ वर्षीय रुग्णावर यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण करण्यात आले. त्यासोबतच, अवयवदानातील एक किडनी नागपुरातीलच न्यू इरा हॉस्पिटलमध्ये ३३ वर्षीय रुग्णावर तर सावंगी मेघे रुग्णालयातील ४३ वर्षीय रुग्णावर दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. दिनेश सोनवणे यांच्या मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना नवे आयुष्य प्राप्त झाले आहे. यासोबतच, नागपुरातील माधव नेत्रपेढीकडे नेत्रप्रत्यारोपणासाठी दिनेश यांचे डोळे सोपविण्यात आले आहे.

सावंगी मेघे रुग्णालयात डॉ. संजय कोलते, डॉ. अमित पसारी, डॉ. अमोल बावणे, डॉ. अभिजित ढाले, डॉ. जय धर्मशी, डॉ. प्रसाद गुजर, डॉ. निलेश गुरू, डॉ. संज्योत निनावे, डॉ. विवेक चकोले, डॉ. नीता वर्मा, डॉ. जुही जाधव, डॉ. रोशनी माणिक, डॉ. धनश्री वंजारी आणि सहयोगी वैद्यकीय चमूने सदर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्णत्वाला नेली. या संपूर्ण प्रक्रियेत रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, समन्वयक डॉ. रुपाली नाईक यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. सावंगी रुग्णालयात जिवंत व मृत व्यक्तीद्वारे प्राप्त झालेल्या किडनीदानातून आजतागायत ७८ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. या वर्षातील हे तिसरे किडनी प्रत्यारोपण असून मरणोत्तर अवयवदानातून झालेली ही दुसरी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होय, असे जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी सांगितले.

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *